चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील HDFC बँकेसमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी घडली.
माजरी येथील प्रॉपर्टी डीलर निलेश नत्थूजी भेले हे बँकेच्या कामासाठी वरोरा येथे आले होते. त्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग कारमध्ये ठेवली होती. ते बँकेत गेले असताना चोरट्यांनी कारची काच फोडून रोकड असलेली बॅग पळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अज्ञात व्यक्ती बॅग घेऊन जाताना दिसून आल्या. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, महिनाभरापूर्वी व्यावसायिक सुधाकर रोहनकर यांच्या कारमधूनही अशाच पद्धतीने सुमारे ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.