

चंद्रपूर : मुल-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दहा मेढ्या चिरडल्या गेल्या. तसेच दोन मेंढीपाळही जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.७) रात्री ८.४५ च्या सुमारास घडली. रवि अल्लीवार आणि रामाजी अल्लीवार (दोघेही रा. गडीसुर्ला) अशी जखमींची नाव आहेत.
मुल येथील रवि अल्लीवार आणि रामाजी अल्लीवार हे दोघे मेंढपाळ रविवारी रात्री मेंढ्यांचा कळप घेऊन मुल–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत होते. वैनगंगा नदी परिसरातील श्री बार जवळ ते आले असता त्यांना एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही मेंढपाळ गंभीर जखमी झाले असून अंदाजे दहा मेंढ्यांचा चिरडून मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सावलीचे पोलीस निरीक्षक प्रविण पुल्लुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत वाहनाचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे.