

Aundha Nagnath Truck crush young man killed
औंढा नागनाथ : हिंगोली–परभणी मार्गावर औंढा नागनाथ बसस्थानकासमोर भरधाव ट्रकने तरुणाला उडविले. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. 3) रात्री सुमारे दहा वाजता घडली.
अर्जुन नामदेव काळे (वय 21, रा. पीपंळदरी, ता. औंढा नागनाथ) असे मृताचे नाव आहे. ते रस्त्यावरून पायी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने (MH-30-AV-1263) त्यांना जोराची धडक देऊन त्याच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांचा संताप वाढला होता. त्यामुळे ट्रक चालकाने ट्रक थेट औंढा पोलीस ठाण्यात नेऊन उभा केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्यासह उपनिरीक्षक शेख खुदुस, गजानन गिरी, वसीम पठाण व इकबाल शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तत्काळ औंढा नागनाथ येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आज (दि. 4) सकाळी 11 वाजता देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.