

Chandrapur Cattle smuggling rescue
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने आज सोमवारी (दि. ५ ) मोठी कारवाई केली. शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवकुंड येथे नाकाबंदी करून कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या ६ बैलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत पिकअप वाहनासह एकूण ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
पोलिस सूत्रानुसार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला ५ जानेवारी २०२६ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा भिवकुंड, भिवकुंड मार्गावरून गोवंशीय जनावरे अवैधरित्या पिकअप वाहनाने कत्तलीसाठी वाहून नेली जात आहेत. त्यानुसार पथकाने सहायक पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात भिवकुंड येथील मौजा भिवकुंड परिसरात नाकाबंदी सुरू केली.
नाकाबंदी दरम्यान पिकअप वाहन क्रमांक MH-49 BZ-1769 थांबवून तपासणी करण्यात आली असता वाहनात ६ बैल कोंबून, बांधून अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने ६ बैलांची सुटका केली. बैलांची अंदाजे किंमत १,५०,००० रुपये, तर अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या पिकअप वाहनाची किंमत ५,७०,००० रुपये, असा एकूण ७,२०,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
वाहन चालक महेश सूर्यभान लोंढे (वय ३८) गोरेवाडा, नागपूर व राहुल अरुण वानखेडे (वय २३) हिंगणा यांच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी सचिन वैद्य याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी शेगाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ०७/२०२६ अंतर्गत कलम ११(१)(घ), ११(१)(ड) – भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०, तसेच कलम ५(अ), ९, ११ – महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात धनराज करकाडे, नितीन साळवे, नितीन कुरेकार, नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, अमोल सावे, गजानन मडावी, गजानन मडावी यांनी केली.
गोवंशीय जनावरांची तस्करी व कत्तलीसाठी होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे. या धडक कारवाईने अवैध जनावर वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.