

Air Quality Index Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर शहर, औद्योगिक पट्टा आणि वाहतुकीमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या विळख्यात दिवसेंदिवस अडकत चालले आहे. केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ वर्षातील २४×७ हवा गुणवत्ता निरीक्षण अहवालानुसार, ३६५ दिवसांपैकी तब्बल २०१ दिवस शहराची हवा आरोग्यासाठी हानिकारक श्रेणीत नोंदवली गेली, तर केवळ ७८ दिवस ‘चांगल्या’ (Good AQI) श्रेणीत आढळले. ही धक्कादायक माहिती पर्यावरण अभ्यासक व ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीच्या आधारे प्रसिद्ध केली आहे.
२०२५ या वर्षातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आकडेवारीनुसार चंद्रपूर शहरात ७८ दिवस आरोग्यासाठी उत्तम (Good AQI – 0 ते 50),८६ दिवस समाधानकारक (Satisfactory AQI – 51 ते 100),१८७ दिवस माफक प्रदूषण (Moderate AQI – 101 ते 200), ३३ दिवस अतिशय प्रदूषित (Poor AQI),१ दिवस आरोग्यासाठी हानिकारक (Unhealthy AQI), ० दिवस ‘Very Poor’ किंवा ‘Severe’ श्रेणीत जरी अधिक घातक श्रेणीतील प्रदूषण नोंदले गेले नसले, तरी वर्षातील २०१ दिवसांची हवा फुफ्फुस, हृदय, दमा, लहान मुले व वृद्धांसाठी धोकादायक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
CAAQMS केंद्राद्वारे शहर आणि खुटाळा औद्योगिक भागात निरीक्षण केले जाते. यात खुटाळा येथे शहरापेक्षा जास्त प्रदूषण आढळत असल्याचेही प्रा. चोपणे यांनी नमूद केले. शहरातील बस स्थानकाजवळील CPCB निरीक्षण केंद्रातील नोंदी या अहवालाचा मुख्य आधार आहेत. मात्र शहरातील इतर अनेक भागात प्रत्यक्ष प्रदूषण पातळी यापेक्षाही जास्त असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.
पावसाळा (१२२ दिवस):५९ दिवस चांगले,५१ दिवस समाधानकारक,१२ दिवस माफक प्रदूषण आढळून आले आहे. तरएकही दिवस अतिघातक श्रेणीत नाही. अतिवृष्टीमुळे प्रदूषणात घट झाल्याचे दिसून येते.
हिवाळा (१२३ दिवस): १४ दिवस चांगले,१४ दिवस,समाधानकारक,९२ दिवस माफक प्रदूषण तर ३ दिवस सर्वाधिक प्रदूषण आढळून आले आहे. संथ हवा व कमी तापमानामुळे हिवाळा आरोग्यासाठी सर्वाधिक घातक ठरला आहे.
उन्हाळा (१२० दिवस): केवळ ५ दिवस चांगले,२१ दिवस समाधानकारक,८३ दिवस प्रदूषित, ११ दिवस अती प्रदूषित, उन्हाळ्यात ९४ दिवस प्रदूषणाच्या सावटाखाली होते.
वर्षातील प्रमुख प्रदूषके:
२०२५ मध्ये चंद्रपुरात सर्वाधिक —३०४ दिवस धुलीकणांचे (PM10/PM2.5) प्रदूषण दिसून आले. तर PM10 : २६२ दिवस,PM2.5 : ४२ दिवस,१२ दिवस कार्बन मोनोक्साइड (CO), ८ दिवस जमिनीवरील ओझोन (O₃),१४ दिवस नायट्रोजन ऑक्साइड (NOx), २७ दिवस सल्फर डायऑक्साइड (SO₂) धुलीकणांचे सातत्याने आढळणारे प्रमाण हे चंद्रपूरच्या प्रदूषण समस्येचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
आरोग्यावर परिणाम व वाढता खर्च:
वायू प्रदूषणामुळे शहरात दमा, टीबी, कर्करोग, श्वसनविकार, डोळे–त्वचा आजार आणि हृदयविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सरकारी व खासगी रुग्णालये रुग्णांनी ओसंडून वाहत असून, उपचारांचा खर्चही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
२००५–०६ मध्ये झालेल्या आरोग्य सर्वेक्षणातही समस्येची तीव्रता दिसून आली होती. मात्र त्यानंतर वारंवार मागणी करूनही नवीन आरोग्य सर्वेक्षण शासनातर्फे झाले नाही, ही बाबही चिंताजनक असल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले.
या परिस्थितीत राजकीय पक्ष, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या आरोग्याची घटनात्मक जबाबदारी ओळखून, प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ आराखडे न बनवता जमिनीवर तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक व नागरिकांकडून होत आहे.