

चंद्रपूर : चिमूर शहरातील नेहरू विद्यालयाच्या मागील भागात एका ३२ वर्षीय युवकाचा रक्तच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी (दि.४) सकाळीच्या सुमारास उघडकीस आली होती. आकाश प्रभाकर उताणे (वय 3) रा. तनिस कॉलनी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अवघ्या तिन तासात घटनेचा तपास करत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. प्राथमिक माहितीनुसार दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या वादातून मित्रांनीच डोक्यावर दगडाने वार करून आकाश प्रभाकर उताणे याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
चिमूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी श्रीमती उषा प्रभाकर उताणे (वय ५०, रा. तनिस कॉलनी, ठक्कर वार्ड, चिमूर) यांनी ४ जानेवारी रोजी तक्रार नोंदवली की, त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताणे (वय ३२) रा. तनिस कॉलनी) याचा नेहरू विद्यालयाच्या मागील परिसरात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. प्राथमिक माहितीनुसार आकाश व आरोपी यांच्यात दारूसाठी पैसे देण्यावरून वाद झाला. नशेत एकमेकांना शिवीगाळी केल्याने झटापट झाली आणि त्यातून आरोपींनी आकाशच्या डोक्यावर दगडाने प्राणघातक वार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
त्यानंतर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, आणि पो.नि. दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले. त्यानंतर या पथकाने अवघ्या 3 तासात घटनेचा तपास करत तिघांना अटक केली. संशयित आरोपी सुजल विलास सोनवाने (वय 20) रा. नेताजी वार्ड, चिमूर, छगण मोहन दिगोरे (वय 27) रा. नेताजी वार्ड, चिमूर, अनिकेत शेषराव साखरकर (वय 24) रा. नेताजी वार्ड, चिमूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.