

Savli forest range fire
चंद्रपूर : मोहाफुले वेचण्यासाठी जंगलात आग लावणे एका महिलेसह तिघांना महागात पडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रात आग लावणाऱ्या तिघांना वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडत त्यांच्यावर वनगुन्हा दाखल केला आहे.
सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड अंतर्गत नियतक्षेत्र सिरसी येथील कक्ष क्रमांक 1534 (संरक्षित वन) परिसरात मोहाफुले वेचण्याच्या उद्देशाने जंगलात आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मौजा लोंढोली येथील वनमाला मोरेश्वर घोंगडे (वय 39), उमेश नरेंद्र घोंगडे (वय 25) आणि भूपेंद्र नीलकंठ खोबे (वय 25) या तिघांविरुद्ध वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.
वनरक्षक सिरसी हे आपल्या पीआरटी समूहासह नियमित जंगल गस्त करीत असताना 28 मार्च 2026 रोजी या तिघांनी जंगलात आग लावल्याचे निदर्शनास आले. आग लावून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा क्रमांक 204/232854/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वनविभागाच्या माहितीनुसार, वने ही राष्ट्रीय संपत्ती असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. वने टिकली तरच पृथ्वीवरील अन्नसाखळी, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल टिकून राहू शकतो. मात्र जनजागृती होऊनही मोहाफुले वेचण्यासाठी किंवा अन्य कारणांमुळे जंगलात कृत्रिम वनवा लावण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 33 (ड) अंतर्गत दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच आगीमुळे वन्यजीव व जैवविविधतेचे मोठे नुकसान झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 9 व 39 अंतर्गत तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
सदर कारवाई विभागीय वनाधिकारी राजन तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवाड पुढील तपास करीत आहेत.
या कारवाईदरम्यान महादेव मुंडे (वनरक्षक सिरसी), एकनाथ खुडे (वनरक्षक गायडोंगरी), श्री. डांगे (वनरक्षक उपरी), सुषमा मेश्राम (वनरक्षक नवेगाव) तसेच पीआरटी चमू आणि बीट मदतनीस शिरसी यांनी सहकार्य केले.
जंगलात आग लावणाऱ्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा वनविभागाने केली आहे. नागरिकांनी शेतातील पाळे-धुरे जाळताना किंवा मोहाच्या झाडाखाली आग लावताना जंगलाला आग लागणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले आहे.