

चंद्रपूर : चिमूर येथील बालाजी सागर तलावामध्ये एका बेपत्ता युवकाचा मृतदेह आज सोमवारी (दि.३०) सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत रविवार २९ मार्च रोजी चिमूर पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज सोमवार (दि.३०) मार्च रोजी सकाळच्या सुमारास तलाव परिसरात काम करणाऱ्या मजुरांना पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोलीस दाखल होताच पंचनामा करण्यात आला. मृत व्यक्तीच्या खिशात आढळलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख राकेश पत्रु डांगे (वय २६, रा. उरकुडपार) अशी पटली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद पढाल, संपत पुलिपाका चिमूर पोलीस करीत आहेत.