

Chandrapur News
चंद्रपूर: लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी किती सतर्क राहावे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात घडली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुकल्याने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळले. मात्र, चंद्रपुरातील पोट विकारतज्ज्ञांनी दुर्बिणीच्या साहाय्याने अत्यंत शिताफीने हे लोहचुंबक बाहेर काढल्याने चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे.
सहा वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता. खेळण्याच्या नादात त्याने लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट पोटात गेले. मुलाने रडत ही बाब पालकांना सांगितली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी तातडीने त्याला डॉक्टरांकडे नेले.
मुलाने घटनेच्या काही वेळ आधीच जेवण केले होते, त्यामुळे त्याला भूल देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आणि जोखमीचे होते. मात्र, मुलाची गंभीर स्थिती आणि लोहचुंबकामुळे होणारा संभाव्य धोका ओळखून डॉक्टरांनी वेळ न घालवता 'एंडोस्कोपी' निर्णय घेतला. डॉक्टरांनी दुर्बिणीच्या मदतीने लोहचुंबक पोटातून बाहेर काढले. या यशस्वी उपचारामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि भविष्यातील शस्त्रक्रिया टळली.
"मुलाने जेवण केले असल्यामुळे भूल देणे धोक्याचे होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही कोणतीही चिरफाड न करता, केवळ २ मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीने ते लोहचुंबक बाहेर काढले."
— डॉ. राहुल सैनानी (गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट)