

Fire breaks out at Raghuvanshi Complex
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. कॉम्प्लेक्समधील एका मेडिकल स्टोअरला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अग्निशमन विभागाला सकाळी सुमारे सहा वाजता रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल करण्यात आले. दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये विविध प्रकारची दुकाने असल्याने आग आणखी पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने आग विझविताना अग्निशमन जवानांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच होते. आगीमुळे नेमक्या किती दुकानांचे नुकसान झाले आणि किती वित्तहानी झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आग पूर्णपणे विझवल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.