

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील साखरा-वडगाव परिसरातील विवाहितेने स्वतःचे जीवन संपवल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात शेगाव (बु.) येथील डॉ. विष्णू विश्वास यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
मयुरी हरिदास सुपारे या विवाहितेने २ ऑगस्ट रोजी आपले जीवन संपविले होते. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत शेगाव (बु.) येथील डॉक्टरांच्या दवाखान्यात गर्भपात झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. या दाव्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान महिलेच्या पतीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर महसूल, पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने डॉ. विष्णू विश्वास यांच्या दवाखान्यावर संयुक्त तपासणी केली. या तपासणीत औषधे, इंजेक्शने, सलाइन, वैद्यकीय उपकरणे तसेच काही प्रतिबंधित औषधांचा साठा आढळून आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांकडून शोध सुरू असताना डॉ. विश्वास फरार झाले होते. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
अटकेनंतर डॉ. विष्णू विश्वास यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विवाहितेने जीवन संपवण्याशी डॉक्टरांचा नेमका काय संबंध आहे, चिठ्ठीतील मजकूर आणि दवाखान्यात सापडलेला औषधसाठा या सर्व बाबींचा शेगाव (बु.) पोलीस अधिक तपास करत आहेत.