

Pombhurna youth death updates
चंद्रपूर : पोंभूर्णा शहरातील रामनगर परिसरात पैसे न दिल्याच्या रागावरून १९ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
रामनगर परिसरातील भारत प्रमोद गुरनुले (वय १९, रा. पोंभूर्णा) या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरात्री निमित्त मार्कंडा जत्रेला जाण्यासाठी भारतने वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. वडिलांनी पैसे नंतर देण्याचे सांगितल्याने तो रागाच्या भरात सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घराबाहेर निघून गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
दरम्यान, लुंबिनी बुद्ध विहार परिसरातील विहिरीजवळ त्याच्या चप्पला आढळून आल्याने संशय बळावला. कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मृतदेह पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे रामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृताच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.