

Chandrapur Municipal Corporation internal rift BJP
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीत भाजप–सेना (उबाठा) युतीने सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपमध्येच श्रेयवादाची लढाई पेटल्याचे चित्र आहे. निकाल जाहीर होताच माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘किंगमेकर’ ठरवणारे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले. मात्र या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधत, “झालेल्या गोष्टीला स्वतःचे लेबल चिटकावण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी टीका केली आहे.
महापौर निवडीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गांधी चौकातील महापालिका परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीच्या वातावरणात सुधीर मुनगंटीवार यांना ‘किंगमेकर’ ठरवणारे फलक झळकावण्यात आले. या माध्यमातून सत्तास्थापनेत मुनगंटीवारांची भूमिका निर्णायक ठरल्याचा संदेश देण्यात आला.
दुसरीकडे, भाजपचेच आमदार किशोर जोरगेवार यांनी या घडामोडींवर टीका करत श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला. “ज्या गोष्टी सामूहिक प्रयत्नांतून घडतात, त्याला एकट्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न होतो आहे,” असे त्यांनी म्हटले.
यासोबतच त्यांनी मूल नगरपालिकेचा संदर्भ देत मुनगंटीवारांवर सवाल उपस्थित केला. “मूल नगरपालिकेत भाजपच्या केवळ दोन जागा निवडून आल्या. तिथे तर मुनगंटीवार वन मॅन शो होते. मग तिथे पराभव का झाला?” असा खरमरीत प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर लगेचच श्रेयवादावरून सुरू झालेली वादाची ठिणगी भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत देत आहे. एका बाजूला मुनगंटीवार समर्थक विजयाचे श्रेय त्यांना देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जोरगेवार गटाकडून या भूमिकेला विरोध केला जात आहे.
महापालिकेतील सत्ता स्थापनेत भाजप–सेना युतीची भूमिका महत्त्वाची ठरली असली, तरी पक्षांतर्गत श्रेयवादाची लढाई भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी काळात भाजप नेतृत्व या वादावर कसा तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.