Chandrapur Police Raid | अंमली पदार्थांविरोधात चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम; हॉटेल्स, लॉजेस अन् ढाब्यांची झाडाझडती

प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने जिल्हाभर अचानक तपासणी; MD ड्रग्ज, गांजासह संशयास्पद वस्तूंचा शोध
Chandrapur Police Anti Drug Drive
Chandrapur Police Anti Drug Drive Pudhari
Published on: 
Updated on: 

Chandrapur Police Anti Drug Drive

चंद्रपूर :  तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने जिल्हाभर विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. एमडी ड्रग्ज, गांजा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री व सेवनाला आळा घालण्याच्या उद्देशाने १६ नोव्हेंबर रोजी नागपूर-चंद्रपूर मार्गासह घुग्घुस आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हॉटेल्स, लॉजेस व ढाब्यांची अचानक तपासणी करण्यात आली. प्रशिक्षित पोलीस श्वान पथकाच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कोणत्याही ठिकाणी अंमली पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नागपूर-चंद्रपूर मार्ग परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पथकाने तपासणी केली. यामध्ये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आलाम, स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे आणि त्यांच्या पथकाने प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने महामार्गावरील हॉटेल्स, लॉजेस, ढाबे तसेच निर्जन ठिकाणी अचानक भेट देऊन झडती घेतली.

Chandrapur Police Anti Drug Drive
Chandrapur Tiger Death | फतापूर मार्गावरील कालव्यात वाघाचा मृतदेह आढळला; बारव्हा परिसरात खळबळ

दरम्यान, घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतही परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली श्वान पथकासह तपासणी मोहीम राबविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, पोलीस अंमलदार रवींद्र शेंडे, तोताराम ठाकरे आणि पवन डाखरे यांनी जयस्वाल ढाबा, गोल्डी ढाबा, विठ्ठल लॉज, पिंटू ढाबा, केके लॉज आणि अनुज लॉज येथे कसून तपासणी केली.

केवळ या दोन परिसरांपुरतीच मोहीम मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची तपासणी केली. या सर्व तपासण्यांदरम्यान अंमली पदार्थ, संशयास्पद व्यक्ती किंवा मालमत्ता आढळून आली नसून, नियमानुसार 'निरंक झडती पंचनामा' तयार करण्यात आला आहे.

Chandrapur Police Anti Drug Drive
Air Pollution Chandrapur | वरोरा–वणी महामार्गावर फ्लाय ॲशचा धुरळा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

यापूर्वी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेशातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचीही प्रशिक्षित पोलीस श्वानाच्या मदतीने तपासणी करण्यात आली होती. अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्री रोखण्यासाठी अशा अचानक तपासण्या यापुढेही जिल्ह्यात नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.