

Dead Tiger Found in Canal Fatapur Road
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बारव्हा परिसरात फतापूर मार्गावरील कालव्यात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विषबाधा की शिकारीचा प्रयत्न, या दिशेने वनविभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारव्हा येथील शेतशिवारात लाकूड गोळा करण्यासाठी गेलेले सुरेश मडावी यांना फतापूर रोडवरील कालव्यात वाघाचा मृतदेह आढळून आला. अचानक वाघाचा मृतदेह दिसल्याने ते घाबरले. त्यांनी तत्काळ याबाबत संबंधितांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील विद्या लढी यांनी पोलीस प्रशासन आणि वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृत वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान, वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की विषबाधा अथवा शिकारीच्या प्रयत्नातून झाला, याचा शोध वनविभाग घेत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेने बारव्हा परिसरात चर्चेला उधाण आले असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.