

Warora Wani Highway Fly Ash Pollution
चंद्रपूर: वरोरा–वणी राष्ट्रीय महामार्गावरील शेंबल टोल नाक्याजवळ फ्लाय ॲशची (कोळशाची राख) मोठ्या प्रमाणात खुलेआम साठवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महामार्गापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या खासगी खुल्या जागेत फ्लाय ॲशचा मोठा साठा करण्यात आल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
फ्लाय ॲशची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे तसेच वाऱ्याच्या झोतामुळे राखेचे सूक्ष्म कण हवेत पसरत असून, याचा त्रास महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संभाव्य आरोग्यविषयक समस्यांसोबतच रस्ते अपघातांचा धोकाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित जागेवर ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी न घेता फ्लाय ॲशची साठवणूक केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. फ्लाय ॲशची साठवणूक करताना धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमानुसार राखेची सुरक्षित साठवणूक आणि वाहतूक करणे आवश्यक असताना खुलेआम होणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
फ्लाय ॲशमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी, साठवणुकीसाठी आवश्यक परवानग्या आणि पर्यावरणविषयक नियमांची तपासणी करावी, तसेच धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या प्रदूषणाचा फटका परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या गंभीर प्रकाराची प्रशासन कधी दखल घेणार आणि संबंधितांवर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.