

Nandgaon Road Pickup Overturns
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव येथे आज (दि.२१) सकाळी घडलेल्या भीषण रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. तेलंगणा येथून रोवणा करून परत येत असताना पिकअप वाहनाने पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर वाहन पलटी होऊन हा अपघात झाला.
तेलंगणा राज्यातून रोवणं करून परत येणाऱ्या प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील नांदगाव येथे लक्की बारच्या बाजूला भीषण अपघातास सामोरे गेले. पिकअप वाहन क्रमांक एम एच 34 बी झेड 3127 ने शेतातून शौचासाठी जाऊन परत येत असलेले हरिदास मेटपल्लीवार (वय ३५) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत हरिदास मेटपल्लीवार यांचा जागीच मृत्यू झाला.
धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात पिकअपमध्ये प्रवास करत असलेल्या डोंगरहळदी येथील रहिवासी वनिता भिकारू मरस्कोल्हे (वय ४०) यांचाही जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत एकूण दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात पिकअपमधील १३ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी महिलेला तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताची सखोल चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या फुटेजच्या आधारे तपास अधिक वेगाने केला जात आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.