

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ पाच दिवसांपूर्वी पैनगंगा खाणीतील अपघातानंतर काल सोमवारी निलजाई खदान परिसरात मातीचा ढिगारा कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दोन घटनांनी खाण व्यवस्थापनातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
घुग्घुस परिसरातील मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ५ वाजता वेकोलि वणी क्षेत्रातील निलजई खदान परिसरात भीषण अपघात घडला. उकनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेला ओबी (ओव्हर बर्डन) टिळा अचानक कोसळला. मातीचा डोंगर एवढ्या वेगाने खाली आला की रस्त्यावरून जात असलेली एक स्कॉर्पियो कार आणि १८ चाकांचा ट्रक मलब्यात गाडले गेले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, अपघाताची दृश्ये सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.
स्कॉर्पियोमध्ये चार युवक प्रवास करत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या युवकांनी कसाबसा मागच्या दरवाजातून बाहेर पडून आपला जीव वाचवला. हे सर्वजण उकनी गावातील रहिवासी असल्याचे समजते. मात्र त्यांची गाडी पूर्णपणे मातीखाली दडपली. याचप्रमाणे, वंदना ट्रान्सपोर्टचा १८ चाकांचा ट्रकही मलब्याखाली अडकला आहे.
या दुर्घटनेमुळे निलजाई–घुग्घुस मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पाळीतील खदान कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने पर्यायी मार्गाने मॅनपॉवर बसमधून घरी पाठवावे लागले. दरम्यान, वेकोलि प्रशासनाने युद्धस्तरावर मदतकार्य सुरू केले असून जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतील दुर्घटना आणि त्यानंतर काल भूगोल परिसरातील खाणीतील नितीन दुर्घटनाणी वेकोलीच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
पैनगंगा खाणीतील अघटित घटना
या दुर्घटनेच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी, २७ ऑगस्ट रोजी कोरपना तालुक्यातील पैनगंगा खुल्या कोळसा खाणीमध्ये देखील भीषण घटना घडली होती. खाणीत पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साचत असल्याने त्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत. त्या पंपचा स्टार्टर काढण्यासाठी खाली उतरलेले अधिकारी वीरेंद्र चांडक व रोहित बांबोर्डे अचानक आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सुदैवाने काही अंतरावर त्यांनी कसाबसा स्वतःला सावरले आणि जीव वाचवला. अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. या घटनेतून खाणींतील सुरक्षेच्या उपाययोजनांचा घोर अभाव स्पष्ट झाला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी थट्टा करणाऱ्या या बेपर्वाईने सर्व स्तरावर चिंता व्यक्त होत आहे.
..तर दोन कर्मचारी वाहून गेले असते, सुरक्षेचा गलथान कारभार उघड
चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी कोळसा खाणी कार्यरत आहेत. मात्र या घटनांनी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खाणीतील पावसाळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. क्षेत्रिय सुरक्षा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा यामुळे अधिकारी–कर्मचाऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आलेले आहे. सुदैवाने निलजाई खाणीतील स्कॉर्पियोतील युवक वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र पैनगंगा व निलजाई खाणीतील घटना ही केवळ धोक्याची घंटा नसून सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने काटेकोरपणे राबविण्याचा इशारा आहे.