Nana Patekar | तीनचाकी सायकल ढकलणाऱ्या मित्रापासून ते आयुष्यभराच्या जिवलगापर्यंत : नानाने प्रसिद्धीच्या शिखरावरही जपला माणुसकीचा ओलावा

नाना पाटेकर आणि आनंदवनातील सदाशिव ताजणे यांचे मैत्रीचे अतूट नाते
Nana Patekar Sadashiv Tajane
Nana Patekar Sadashiv TajanePudhari
Published on: 
Updated on: 

Nana Patekar Sadashiv Tajane

चंद्रपूर: चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर आणि आनंदवनातील कार्यकर्ते सदाशिव ताजणे यांच्यातील मैत्रीचे नाते केवळ परिचयापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते आयुष्यभराच्या जिव्हाळ्यात रूपांतरित झाले. १९७८-७९ च्या सुमारास आनंदवनात झालेली पहिली भेट, संध्याकाळच्या फेरफटक्यात तीनचाकी सायकल ढकलणारा मित्र, मुंबईत नाटक पाहायला गेल्यावर पहिल्या रांगेत बसवणारा नाना आणि प्रत्येक भेटीत घट्ट मिठी मारून कुटुंबाची आस्थेने विचारपूस करणारा जिवलग मित्र, अशा असंख्य आठवणी सदाशिव ताजणे यांच्या मनात आजही ताज्या आहेत.

आनंदवनात जुळले मैत्रीचे सूर

सदाशिव ताजणे यांच्या आठवणींनुसार, नाना पाटेकर आणि त्यांच्या पत्नी नीलकांती ताई आनंदवनात वास्तव्यास आले होते, त्या काळात त्यांची ओळख झाली. तिघेही संध्याकाळी फिरायला जात असत. त्या वेळी नाना ताजणे यांची तीनचाकी सायकल ढकलायचा. या छोट्याशा प्रसंगातून सुरू झालेली मैत्री पुढे अधिक घट्ट होत गेली. नानाला आनंदवनातच राहण्याची इच्छा होती; मात्र बाबा आमटे आणि साधनाताईंनी त्याच्यातील कलागुण ओळखून त्याला मुंबईच्या नाट्यविश्वात जाण्यास प्रोत्साहन दिले. मुंबईत राहूनही आनंदवनाच्या कार्यासाठी योगदान देता येईल, असा विश्वास त्यांनी त्याला दिला. पुढे नानाने अभिनय क्षेत्रात यश मिळवले, तरी आनंदवनाशी असलेले नाते कायम जपले.

Nana Patekar Sadashiv Tajane
Nana Patekar rifle shooter |उत्कृष्ट नेमबाज-नाना पाटेकर

आनंदवनातील वस्तूंच्या विक्रीलाही दिले बळ

आनंदवनातील कुष्ठमुक्त व्यक्ती आणि दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शने भरवण्यासाठी कार्यकर्ते मुंबईला जात असत. त्या वेळी नानाच्या नाटकाला जाण्याचा बेत आखला की तो त्यांचे आनंदाने स्वागत करायचा. “माझे सगळे मित्र आले आहेत!” असे म्हणत त्यांना पहिल्या रांगेत बसवायचा. आनंदवनात तयार झालेले कपडे, चपला, टॉवेल आणि सतरंज्या अशा वस्तूंचा तो स्वतः वापर करायचा. इतरांनीही या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन तो करत असे.

स्वरानंदवनच्या कलाकारांशीही जिव्हाळ्याचे नाते

स्वरानंदवन ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून नानाचे आनंदवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. त्याला तबला वाजवण्याची विशेष आवड होती. स्वरानंदवनमध्ये आल्यावर तो तबला वाजवण्यात रमून जायचा. प्रत्येक कलाकाराला प्रेमाने मिठी मारणे, मूकबधिर मुलांशी गमतीजमती करत संवाद साधणे, यातून त्याची आत्मीयता दिसून यायची.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात स्वरानंदवनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नाना पाटेकर आणि दिवंगत आर. आर. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आनंदवनाच्या कार्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमातून आनंदवनाला सुमारे दीड कोटी रुपयांची मदत मिळाली होती. या उपक्रमामुळे आनंदवनाच्या कार्याला आर्थिक पाठबळ मिळण्यासोबतच दिव्यांग कलाकारांच्या कलेला व्यापक व्यासपीठ मिळाले.

Nana Patekar Sadashiv Tajane
Nana Patekar Indian Army | केवळ अभिनेता नव्हे, तर कारगिल लढणारा जवान

पत्नीशी सांकेतिक भाषेत संवाद

नाना आनंदवनात आला की सदाशिव ताजणे यांना आवर्जून भेटायचा. भेटल्यावर सुमारे दहा मिनिटे त्यांना घट्ट मिठी मारून कुटुंबाची विचारपूस करायचा. ताजणे यांची पत्नी मूकबधिर असल्याने नाना तिच्याशी सांकेतिक भाषेत संवाद साधत असे. तिच्याशी बोलताना त्याला विशेष आनंद व्हायचा. “मुंबईला घरी या. जेवण केल्याशिवाय जायचे नाही,” असे तो नेहमी प्रेमाने सांगायचा. नीलकांती ताई आणि मुलगा मल्हार यांच्याशीही ताजणे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

मदतीपलीकडची माणुसकी

नाना पाटेकर यांचे आनंदवनाशी असलेले नाते केवळ आर्थिक मदत किंवा सामाजिक उपक्रमांपुरते मर्यादित नव्हते. आनंदवनातील कुष्ठमुक्त बांधव, दिव्यांग व्यक्ती, कलाकार आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी मनापासूनचे संबंध जपले. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही जुन्या मित्रांना विसरायचे नाही, त्यांच्या कुटुंबाची आस्थेने विचारपूस करायची आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे, हा त्यांचा स्वभाव सदाशिव ताजणे यांच्या आठवणींतून पुढे येत आहे.

तीनचाकी सायकल ढकलणारा मित्र, नाटकाच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत बसवणारा कलावंत, स्वरानंदवनमध्ये तबला वाजवणारा कलाकार आणि भेटल्यावर प्रेमाने मिठी मारणारा जिवलग माणूस, अशा विविध रूपांत नाना ताजणे यांच्या आठवणींत कायमचा घर करून आहे. नाना पाटेकर आणि सदाशिव ताजणे यांची ही मैत्री म्हणजे प्रसिद्धीपेक्षा माणुसकी मोठी असते, याची जिवंत साक्ष आहे. आनंदवनाशी जोडलेले हे नाते प्रेम, विश्वास, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर आजही स्मरणात राहणारे आहे.

- सदाशिव ताजणे, आनंदवन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news