

Nagbhid Funeral Wood Shortage
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथे अंत्यसंस्कारासाठी सरणाचे लाकूड उपलब्ध न झाल्याने मृत व्यक्तीच्या पार्थिवावर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयावर आली. या निमित्ताने विभागाच्या तळोधी बा. येथील जळाऊ काष्ठ भंडारात गेल्या दोन महिन्यांपासून लाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथील रहिवासी युवराज मेश्राम यांचे काल गुरुवारी निधन झाले. आज सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले सरणाचे लाकूड मिळविण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गावात आणि तळोधी (बा.) येथील जळाऊ काष्ठ भांडारात विचारपूस केली असता लाकडे उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. अन्य ठिकाणीही शोधाशोध केली. परंतु लाकडे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शोकाकुल कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले.
अखेर कोणताही पर्याय उरला नसल्याने ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीत खड्डा खोदून युवराज मेश्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हा प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले. माणसाच्या शेवटच्या प्रवासासाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अंत्यसंस्कारासाठी सरणाचे लाकूड नियमित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यापूर्वीही अनेकदा वन विभागाकडे करण्यात आली होती. मागील गेल्या दोन महिन्यांपासून तळोधी बा. येथील जळाऊ काष्ठ भंडारात लाकडे उपलब्ध नसल्याने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना यावेळीही अडचणींचा सामना करावा लागला.
ग्रामीण भागातील अनेक स्मशानभूमींमध्ये सरणासाठी आवश्यक लाकडाची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने दुःखाच्या प्रसंगातही नातेवाईकांना लाकडासाठी धावपळ करावी लागते. कोजबी चक येथील ही घटना केवळ एका कुटुंबाच्या दुःखाची कहाणी नसून ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधांच्या अभावाचे विदारक वास्तव आहे. वन विभागाने जळाऊ काष्ठ भंडारात नियमित लाकडाचा साठा उपलब्ध करून देत भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी वेळ येऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाबाबत तळोधी बा. उपवन क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "तळोधी बा. येथील जळाऊ काष्ठ भंडारात गेल्या दोन महिन्यांपासून लाकडे उपलब्ध नाहीत. याबाबत वरिष्ठ विभागाकडे आवश्यक लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात असा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.