

Congress Shiv Sena UBT Alliance
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली आहे. सत्तास्थापनेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याने, या भेटीकडे चंद्रपूरच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत मातोश्रीवर हजेरी लावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहा नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक असे एकूण आठ नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय दोन अपक्ष नगरसेवक या गटाच्या संपर्कात असल्याने, ठाकरे गट–वंचित–अपक्ष असा एकूण दहा नगरसेवकांचा संख्याबळ तयार झाले आहे. 66 सदस्यांच्या मनपेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 34 जागांच्या तुलनेत हे संख्याबळ सत्तास्थापनेत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संभाव्य समन्वयाबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर पदासह सत्तेतील सहभागाबाबत कोणती भूमिका घेतली जाणार, यावर या बैठकीत खल झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, चंद्रपूर मनपात काँग्रेसमध्येही अंतर्गत मतभेद सुरू असून, भाजप आणि महायुती सत्तेसाठी प्रयत्नशील आहेत. अशा स्थितीत ठाकरे गट–वंचित–अपक्ष या दहा नगरसेवकांचा पाठिंबा कुणाला मिळतो, यावर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासमीकरण ठरणार आहे.
मातोश्रीवरील या भेटीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत पुढील दिशा स्पष्ट होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.