

Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम असून, या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. चंद्रपूरमधील राजकीय परिस्थिती आणि सत्तासमीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आल्याने, ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला असून, विविध पक्षांकडून पर्यायी रणनीती आखल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याची राजकीय स्थिती, संभाव्य सत्तासमीकरणे आणि पुढील धोरण याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 23 जागांवर तर शिवसेना शिंदे गटाला 1 जागेवर विजय मिळाला असून, महायुतीकडे सध्या एकूण 24 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मात्र 66 सदस्यांच्या मनपेत बहुमतासाठी किमान 34 नगरसेवकांची आवश्यकता असून, महायुती अद्याप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला या निवडणुकीत एकूण 8 जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत हा गट निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर ठाकरे गट–वंचित आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, त्यामुळे चंद्रपूरमधील राजकारण अधिकच रंगतदार बनले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली ही भेट आगामी सत्तास्थापनेच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चंद्रपूर महापालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, आणि कोणता गट निर्णायक ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.