

Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेत ठाकरे गटाच्या शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरत असताना, महापौर पदावर आपलाच दावा असल्याचे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. पहिली अडीच वर्षे महापौर पद ठाकरे सेनेलाच मिळावे, अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केल्याने सत्तासमीकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने महापौर पदावर ठाम दावा ठोकला आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली असून, पहिली अडीच वर्षे महापौर पद ठाकरे सेनेलाच मिळावे, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
संदीप गिऱ्हे म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ठाकरे सेनेची भूमिका निर्णायक ठरत आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आम्ही आपली अट स्पष्टपणे मांडली आहे. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गिऱ्हे यांनी सांगितले की, ठाकरे सेनेची चर्चा केवळ काँग्रेससोबतच नव्हे तर भाजपसोबतही सुरू आहे. “भाजपने जर आमचा महापौर केला, तर आम्ही भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करू,” असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
तसेच, “राजकारणात संवाद सुरू असला पाहिजे आणि तो सुरू आहे. आम्हाला महापौर पद हवे आहे. काँग्रेसने जर आमची अट मान्य केली, तर काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यास आमची तयारी आहे,” असेही संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले.
एकीकडे काँग्रेस–उबाठा यांच्यात अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असताना, ठाकरे सेनेने पहिल्या टप्प्यात महापौर पदाची मागणी केल्याने निर्णय अधिक अवघड बनला आहे. दुसरीकडे भाजपही सत्तेसाठी प्रयत्नशील असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार होत आहे.आगामी काही तासांत किंवा दिवसांत कोणता पक्ष ठाकरे सेनेच्या अटी मान्य करतो, आणि चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.