Chandrapur Corporator Kidnapping |काँग्रेस नगरसेवकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न; समृद्धी महामार्गावर थरार, राजकीय चढाओढ तीव्र!

चंद्रपूरच्या नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी; १७ जणांविरोधात गुन्हा दाखल, महापालिका सत्ता स्थापनेच्या संघर्षात खळबळ
Chandrapur Corporator Kidnapping |काँग्रेस नगरसेवकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न;
Chandrapur Corporator Kidnapping |काँग्रेस नगरसेवकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न;
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच विजय वड्डेटीवार गटाच्या काँग्रेस नगरसेवकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स अडवून नगरसेवक राजेश अडूर यांना जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात १७ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता कोणाची यावरून सुरू असलेली राजकीय चढाओढ अधिकच तीव्र होत असतानाच काँग्रेस नगरसेवक राजेश अडूर यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना समृद्धी महामार्गावरील सावंगी जवळील गणेशपूर शिवारात घडली. नगरसेवक राजेश अडूर हे पुण्याहून नागपूरकडे खासगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत होते. त्यांच्या सोबत पत्नी अश्विनी अडूर, नगरसेवक मित्र सचिन कत्याल, सोफिया खान, अब्दुल करीम शेख, वसंता देशमुख, करिष्मा जंगम यांच्यासह इतर नगरसेवकही बसमध्ये उपस्थित होते. दरम्यान, गणेशपूर शिवारात चार ते पाच खासगी वाहनांमधून आलेल्या तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांच्या टोळीने अचानक ट्रॅव्हल्स बस अडवली.

Chandrapur Corporator Kidnapping |काँग्रेस नगरसेवकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न;
Chandrapur News | चंद्रपूर मनपातील सत्ता स्थापनेला नवे वळण; विजय वडेट्टीवार–उद्धव ठाकरे भेटीनंतर महापौर पदावर ‘अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला’

आरोपी बसमध्ये घुसून ‘आमच्यासोबत चला’ अशी धमकी देऊ लागले. विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी सौरभ अरुण ठोंबरे रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर हा आरोपी नगरसेवक अडूर यांना उद्देशून “सोहेलभाई शेख इनसे बात कर लो” असे म्हणत होता. आपण कशासाठी सोबत यावे, असा प्रश्न अडूर यांनी विचारताच आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली, शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सावंगी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

नगरसेवक अडूर यांनी प्रसंगावधान राखत हिंमतीने या गुंडांचा सामना केला. बसमधील सर्व नगरसेवकांनी आरडाओरड सुरू करताच आरोपी घाईघाईने वाहनांमध्ये बसून पळून गेले. मात्र, त्यापैकी एकाला नगरसेवक व सहकाऱ्यांनी पकडून ठेवले. त्याने आपले नाव कॉनेन शमीम सिद्धीकी (वय २१) रा. इंदिरानगर, घुग्गुस, जि. चंद्रपूर, सध्या खापरखेडा, नागपूर असे सांगितले.

चौकशीत त्याने मुजम्मौल खान (मोमीनपुरा, नागपूर), जासीम खान (मानकापूर), आलोक रोहिदास (अजनी), अदनान शेख (मानकापूर) तसेच सौरभ ठोंबरे यांच्यासह अन्य १० ते १५ जण या कटात सहभागी असल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक राजेश अडूर यांच्या तक्रारीवरून सौरभ ठोंबरे, कॉनेन शमीम सिद्धीकी यांच्यासह इतर १० ते १५ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२), १८९ (२), १९०, ३५१ (३), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहेत.

दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आलेला असताना घडलेल्या या घटनेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची आहे की त्यामागे राजकीय दबावाचा प्रयत्न आहे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन व पोलिस यंत्रणेची पुढील भूमिका काय राहते, यावर अनेक प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news