

Free Sand Distribution Gharkul Yojana
चंद्रपूर : राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती, मूल यांच्या वतीने ग्रामपंचायत मारोडा येथे 474 घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मारोडा येथील विश्वशांती विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेती वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोडाचे सरपंच भिकारुजी शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून संध्या गुरनूले, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक मंजिरी टकले, घुगुस येथील लॉईड मेटल्सचे जनरल मॅनेजर विद्या पाल, गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मारोडा हे गाव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव कन्नमवार यांची कर्मभूमी असल्याचे नमूद करून, या गावातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप होत असल्याचा विशेष आनंद व्यक्त केला. शासनाच्या धोरणानुसार रेती मोफत असून वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांनी करावयाचा असतो; मात्र लॉयड मेटलच्या सीएसआर निधीतून मारोडा हे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून, येथे लाभार्थ्यांना रेती घरपोच मिळणार आहे. तसेच प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात वाहतुकीसाठी पाच हजार रुपये जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी, मारोडाचे सरपंच श्री. शेंडे यांनी मोफत रेतीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी 25 लक्ष रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आला, ज्यामुळे 474 लाभार्थ्यांना शासन अनुदानासोबत अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
या अभियानांतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, आधार, जॉबकार्ड व बँक खाते केवायसी शिबीर, महसूल विभागामार्फत विविध प्रमाणपत्रांचे वाटप तसेच उमेद अंतर्गत लखपती दीदींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी किशोर शिंदे यांनी केले. संचालन विद्या कोसे यांनी तर आभार उपसरपंच अनुप नेरलवार यांनी मानले.