

चंद्रपूर : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर घुग्घुस नगरपरिषदेत झालेल्या पहिल्याच सत्तासंघर्षात काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली आहे. नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी १६ मते मिळवून शानदार विजय संपादन केला. या विजयामुळे नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.
उपाध्यक्ष निवडीसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 23 नगरसेवकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये राजू रेड्डी यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. राजू रेड्डी (काँग्रेस) यांना १६ तर गणेश पिंपळकर (भाजप) यांना ७ मते मिळाली.
भाजपचे उमेदवार गणेश पिंपळकर यांना केवळ ७ मतांवर समाधान मानावे लागले, तर रेड्डी यांनी विजय मिळवत उपाध्यक्षपद आपल्या नावे केले. विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर घुग्घुस शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष साजरा केला.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.