

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीव आणि मानवी आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने विशेष निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या संयुक्त मोहिमेत आतापर्यंत २२७१ कुत्र्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, वन्यजीव संवर्धनातील हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये भटक्या कुत्र्यांकडून हरिण, ससा, मोर, कोल्हा तसेच लहान पक्ष्यांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला, तर काही जखमी प्राण्यांना रेबीज व डिस्टेंपरसारख्या संसर्गजन्य आजारांची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
याच गंभीर पार्श्वभूमीवर, प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २००१ व २०२३ मधील सुधारित प्राणी जन्म नियंत्रण नियम आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर), पीपल फॉर ॲनिमल्स (वर्धा) आणि वाइल्ड सीईआर (Wild CER) यांच्या संयुक्त विद्यमाने निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे.
बफर क्षेत्रातील ९५ गावांमध्ये झोननिहाय सर्वेक्षण करून कुत्र्यांची जास्त संख्या असलेल्या व नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गावांना प्राधान्य देण्यात आले. सूर्योदयापासून जाळ्यांच्या साहाय्याने कुत्र्यांना अत्यंत काळजीपूर्वक पकडून निर्बीजीकरण केंद्रात नेले जाते. येथे तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. गरोदर माद्या, दूध पाजणाऱ्या माता, आजारी, अशक्त, वृद्ध कुत्रे तसेच सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या पिल्लांवर शस्त्रक्रिया केली जात नाही.
फक्त निरोगी कुत्र्यांवरच शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर योग्य औषधोपचार, जंतनिर्मूलन व त्वचारोगांवर उपचार केले जातात. पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना पकडलेल्या ठिकाणीच सोडले जाते. सोडण्यापूर्वी सर्व कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस तसेच डिस्टेंपर, डायरिया, उलट्या आदी आजारांपासून संरक्षणासाठी DHPPiL लस दिली जाते.
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत पीपल फॉर ॲनिमल्स, वर्धा तर्फे १८८९ तर वाइल्ड सीईआर तर्फे ३८२ अशा एकूण २२७१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण झाले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत १००% उद्दिष्ट पूर्ण करण्याचे व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचे नियोजन आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजचा प्रसार आणि चावे घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. ही समस्या वन्यजीवांसह मानवी आरोग्यासाठीही चिंताजनक आहे. त्यामुळे हा निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवला जाईल आणि भविष्यात या समस्येला प्रभावीपणे आळा घातला जाईल.
प्रभू नाथ शुक्ला, (क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प)