

Manikgad Cement Mine Protest
चंद्रपूर : राजुरा उपविभागातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मागणीसाठी पाच शेतकऱ्यांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
राजुरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कुसुंबी गावातील कोलाम व इतर आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मानिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक) यांच्या चुनखडी (लाईम स्टोन) खाणीसाठी गेल्या असून, त्या जमिनींचा मोबदला अथवा जमीन परत मिळावी या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
सोमवारी (दि. १३) दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा येथील उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयातच विष प्राशन केले. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये लच्चू चिन्नू मडावी (वय ५५, रा. बांबेझरी), जयराम गंगू मडावी (वय ४५, रा. नोकारी), जंगू सोमा पेंदोर (वय ४८, रा. कुसुंबी), बालाजी शिडाम (वय ५२, रा. नोकारी) व मारोती कर्णू तलांडे (वय ५५, रा. कुसुंबी) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वांना तत्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
कुसुंबी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मानिकगड सिमेंट कंपनीच्या खाण प्रकल्पात गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांनी गेल्या १५ वर्षांत अनेक वेळा निवेदने, आंदोलने करून आपल्या हक्कासाठी आवाज उठविला. मात्र ना कंपनीकडून ठोस प्रतिसाद मिळाला, ना प्रशासनाने ठोस तोडगा काढला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सुमारे दहा महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांनी सर्वे क्रमांक ४४, ४५, ४६, ४७ या जमिनींची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही प्रत्यक्ष मोजणी झाली नाही. या मोजणीशिवाय मोबदला किंवा जमीन परत मिळण्याचा प्रश्नच सुटू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
सततच्या विलंबामुळे आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयातच विष प्राशन करून आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास राजुरा पोलीस करीत आहेत.