

चंद्रपूर : वरोरा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवी कमल कोटेक्स जिनिंग प्रेसिंगला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्याने जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला सुमारे १० ते १२ हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्घटनेत १० कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज सोमवार, १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिनिंगमधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण साठवणूक परिसराला वेढले. गेल्या दोन दिवसांपासून जिनिंगमधील नियमित कामकाज बंद होते, मात्र अचानक लागलेल्या या आगीने सर्वांचीच धांदल उडवली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, कापूस हलवण्यासाठी वापरण्यात येणारे एक वाहनही या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच वरोरा प्रशासकीय यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. तहसीलदार योगेश कौटकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरोरा नगरपालिकेसह भद्रावती, वणी, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती, जीएमआर, साई वर्धा, डब्ल्यूसीएल आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण आठ अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत तब्बल चार ते पाच तास उलटूनही आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. पाण्याचा सतत मारा सुरू असूनही कापसाच्या ढिगाऱ्याखाली असलेली आग धुमसतच होती.
या भीषण अग्नितांडवामध्ये माणुसकीचे आणि हतबलतेचे एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. जिनिंगमध्ये कामगारांच्या चहापानाची व्यवस्था करणाऱ्या गिताबाई नावाच्या महिला कर्मचाऱ्याने, आपली कर्मभूमी आगीत जळताना पाहून, हातात असलेल्या बादलीने आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भीषण ज्वाळांसमोर त्यांचा हा प्रयत्न अपुरा असला तरी, त्यांच्या या धाडसाची चर्चा घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या ओठावर होती.
दोन दिवसांपासून जिनिंगचे कामकाज अधिकृतपणे बंद असताना ही आग लागल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सुट्टीच्या दिवशी जिनिंगमध्ये काही अंतर्गत कामे सुरू होती का? किंवा ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारणाने, याचा शोध पोलीस आणि महसूल प्रशासन घेत आहे. मात्र, या आगीने उद्योजकाचे अतोनात आर्थिक नुकसान केले असून शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे.