

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांनी अवैध सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा गंभीर मुद्दा राज्यात गाजत असताना, या प्रकरणी रोशनच्या कुटुंबाची भेट पालकमंत्री अशोक उईके यांनी घेतली नसल्याचा प्रश्न आंदोलनातून उपस्थित झाला. या अनुषंगाने दैनिक पुढारीच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री उईके यांना थेट विचारणा केली असता, त्यांनी “प्रकरणाची चौकशी करून संगती लावून सांगतो” असे म्हणत अधिक बोलणे टाळले. शेतकरी संकटातील या प्रश्नावर जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्पष्ट भूमिका न मांडल्याने पालकमंत्र्यांच्या मौनाची चर्चा आता राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र झाली आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुळे यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री अशोक उईके यांनी अद्याप भेट दिली नसल्याचा मुद्दा शनिवारी आक्रोश मोर्चातून पुन्हा अधोरेखित झाला. या घटनेने जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुख असलेल्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेबाबत जनतेत आणि विशेषतः शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटला.
याच मुद्द्याच्या अनुषंगाने दैनिक पुढारीने पालकमंत्री अशोक उईके यांना थेट सवाल केला की, “रोशन कुळे यांच्या कुटुंबीयांची भेट आपण का घेतली नाही? त्यांना धीर देण्यासाठी आपण कधी जाणार?”
या प्रश्नावर पालकमंत्री उईके यांनी अत्यंत संक्षिप्त प्रतिक्रिया देत, “मी या प्रकरणाची चौकशी करून सांगतो , असे उत्तर दिले. पुढारीच्या प्रतिनिधींनी पुनःपुन्हा विचारणा करूनही त्यांनी ठोस उत्तर देण्यास नकार देत विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे शेतकरी प्रश्नांवरील संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जबाबदार मंत्री म्हणून या प्रकरणावर तातडीने प्रतिक्रिया देणे अपेक्षित असताना, मौन आणि टाळाटाळीची भूमिका घेतल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील संवादाच्या अंतरावरही प्रकाशझोत पडला आहे.
बाजारपेठेत व नागरिकांमध्ये उमटलेले पडसाद :
पालकमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर, “चौकशी करून बोलेन म्हणत जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे का?” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेल्या मंत्र्यांकडून अशा कठीण प्रसंगी कुटुंब भेटीवर स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने, मंत्री शेतकरी प्रश्नांपासून अंतर राखत आहेत का? असा सवाल स्थानिक स्तरावरून व्यक्त होत आहे.
या घटनेतून विरोधी सूर अधिक तीव्र होत असून, पालकमंत्री अशोक उईके यांच्या प्रत्यक्ष उत्तर टाळण्याच्या शैलीमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. “शेतकरी संकटावर भाष्य करणे टाळले जात आहे, ही सामाजिक प्रश्नांवरील राजकीय अॅलर्जी तर नाही ना?” अशी भावना अनेक नागरिकांमध्ये बोलली जात आहे.