

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत २६७ विद्यार्थ्यांना शिळे अन्न, दूषित पाणी, अपुरी स्वच्छता आणि आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव या कारणांमुळे विद्यार्थ्यांना आजारपणाला सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांना आरोग्याच्या कारणाने पालकांनी शाळेतून घरी नेल्याने शाळा ओस पडली. त्यानंतर पालक व आदिवासी संघटनांनी अधिक्षकावर कार्यवाहीची तक्रार केली. कार्यवाहीनंतरच विद्यार्थ्यांनी शाळेत परतण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी केल्याने आणि सुरू असलेल्या विभागीय चौकशीत अधिक्षकाचा अडथळा निर्माण होऊन यये नये या करीता नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्तांनी तातडीने अधीक्षक अजय सोनुले यांची बदली करून विभागीय चौकशी सुरू केली आहे.
चिमूर प्रकल्पातील जांभूळघाट येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये २६७ विद्यार्थ्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यावेळी शालेय व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर आला. पालक व विद्यार्थ्यांनी शाळेतील मिळणाऱ्या सोईसुविधाची चिरफाड केली. ऐवढेच नव्हे तर अधिक्षक सोनुले यांच्यावर विविध आरोप करून कार्यवाहीची मागणी केली होती. कार्यवाही होत नाही तो पर्यंत घरून शाळेत परतणार नाही अशी भूमिका घेत्याने येथील शैक्षणिक व्यवस्था कोलमडली होती. पालकांच्या आरोपानुसार शिळे अन्न, दूषित पाणी, अस्वच्छ शौचालये, अपुरी निवास व्यवस्था आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना तातडीने घरी नेले, परिणामी शैक्षणिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली.
अधीक्षकांची बदली : पुराडा येथे नवीन नियुक्ती
या गंभीर प्रकरणाची दखल घेत नागपूर विभागाचे उपआयुक्त (आदिवासी विभाग) आयुषी सिंग यांनी तातडीने अधीक्षक अजय सोनुले यांची गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पुराडा शासकीय आश्रमशाळेत बदली केली आहे. ही बदली सक्तीची व प्रशासकीय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सदर अधिक्षकाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळल्यास निलंबणाची कार्यवाही करण्याचे संकेत देण्यात आले आहे. विशेष म्हणजे विभागीय चौकशीमध्ये सदर अधिक्षकाचा अडथळा निर्माण होऊ नये या कारणाने तातडीने बदली करण्यात आल्याचे वरिष्ठांनी सांगितले आहे. या प्रकरणानंतर केवळ जांभूळघाट नव्हे तर विदर्भातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या भोजनव्यवस्थेवर आणि सोयी-सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आदिवासी संघटना, विद्यार्थी व प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा ठामपणे लावून धरल्याने उशिरा का होईना आदिवासी विभागाच्या प्रशासनाला कारवाई करावी लागली आहे.
जांभूळघाट आश्रमशाळा प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात झालेल्या तक्रारीनंतर अधीक्षकांची सक्तीची बदली करण्यात आली असून विभागीय चौकशी सुरू आहे.
आयुषी सिंग, उपआयुक्त आदिवासी विभाग, नागपूर