

Brahmapuri illegal money lending Case
चंद्रपूर : अवैध सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषणाबाबत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अवैध सावकारीचा आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज देऊन नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सावकारांविरोधात ब्रम्हपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी ब्रम्हपुरी येथील एका रहिवासी नागरिकाने पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदविली आहे. फिर्यादी हा सिटी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत असून, कामकाजासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्याने ब्रम्हपुरी येथील लक्ष्मण पुंडलिक उरकुडे याच्याकडून वेळोवेळी एकूण ८ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते.
या कर्जाची परतफेड करण्यासाठी फिर्यादीने सोनार, म्युच्युअल मनी, नातेवाईकांकडून पैसे घेणे तसेच घर गहाण ठेवून एकूण ३१ लाख ४२ हजार ६०० रुपये सावकार लक्ष्मण उरकुडे यांना दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तरीही अवाजवी व्याजामुळे आपला आर्थिक, मानसिक व सामाजिक छळ होत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या तक्रारीच्या आधारे आरोपी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (वय ४५) रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अपराध क्रमांक ६५६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अवैध सावकारीविरोधात पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने, पोलिसांच्या भूमिकेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध सावकार मुद्दलाच्या रकमेवर अव्वाचे सव्वा व्याज आकारून आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक छळ करत असल्यास तात्काळ माहिती द्यावी.
यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचा 112 किंवा 7887890100 या क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल तसेच दोषी अवैध सावकारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस विभागाने दिले आहे.