Chandrapur News | सरकारी दुटप्पी धोरणांमुळेच शेतकऱ्याला किडनी विकावी लागली : ॲड. वामनराव चटप
Chandrapur farmer issues
चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी, दुटप्पी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून, शेती कर्ज फेडण्यासाठी थेट स्वतःची किडनी विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांच्या दुर्दैवी घटनेने शासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपली किडनी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी तीव्र संताप व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ॲड. चटप यांनी म्हटले की, सरकार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात अपयशी ठरत आहे. उलट, ज्या वेळी शेतमाल बाजारात येतो, त्या काळात परदेशातून शेतमाल व शेतमालजन्य वस्तूंची आयात करून दर पाडले जातात. दुसरीकडे देशात कापूस, तांदूळ, गहू, सोयाबीन यांसारख्या पिकांचा मोठा साठा असतानाही निर्यातबंदी लावून शेतकऱ्यांना कमी दरात शेतमाल विकण्यास भाग पाडले जाते.
सरकार नव्या तंत्रज्ञानाला विरोध करून अधिक उत्पादन घेण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनाही अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार कोणाचेही असो, आजपर्यंत शेतकऱ्यांची लूटच झाली आहे,” असा घणाघाती आरोप ॲड. चटप यांनी केला. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांनी केंद्र सरकारच्या कृषी कृती दल (टास्क फोर्स) आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या गर्तेतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला होता. मात्र, शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या शिफारसी स्वीकारून त्यांची अंमलबजावणी सरकारने केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना सरकारकडून अत्यल्प मदत देऊन जखमेवर मीठ चोळले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. “रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्यावर किडनी विकण्यासारखी अमानुष परिस्थिती येते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” असे सांगत ॲड. चटप यांनी संताप व्यक्त केला. “शेतकरी तितुका एक एक” या भूमिकेतून सर्व शेतकऱ्यांचे कर्ज संपूर्णपणे माफ करून त्यांना कर्जमुक्त केले, तरच अशा हृदयद्रावक घटना थांबतील, असे मत ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले आहे.

