

Chandrapur murder case
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बिनबा वार्डात एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पोटच्या मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या वडिलांचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.२३) रात्री घडली. ताराचंद उर्फ दारासिंग बाबुसिंग बैस (वय ६२) असे मृत बापाचे नाव आहे.याप्रकरणी मुलगा मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ताराचंद यांची वरोरा तालुक्यातील मोवाडा गावात शेती असून त्यांचा मुलगा मुन्ना हा सतत शेतीच्या मालकीसंदर्भात घरात वाद घालत असायचा. सोमवारी रात्री रात्री ९ ते ११ च्या दरम्यान मुन्ना हा दारूच्या नशेत घरी आला आणि पुन्हा एकदा जुन्या शेतजमिनीच्या वादावरून वडिलांशी वाद घालू लागला. हा वाद विकोपाला गेल्याने मुन्ना याने एका धारदार शस्राने वडिलांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर सपासप वार करत त्यांचा निर्घृण खून केला.
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल चंद्रपूर येथे रवाना केला आणि आरोपी मुन्ना याला ताब्यात घेतले. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस यांच्यावर मंगळवारी (दि.२४) गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी नओमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवने आणि चंद्रपूर शहर पोलीस पथक करत आहेत.