

Stepbrother murdered over property dispute
टिटवाळा : पुढारी वृत्तसेवा कल्याण तालुक्यातील नालिंबी गावच्या जंगलात आढळलेल्या छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या रहस्यमय प्रकरणाचा थरारक उलगडा आता झाला असून, खुनाचा सूत्रधार कोणी बाहेरचा नव्हे, तर मृताचा सख्खा सावत्र भाऊच निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२९ मे २०२५ रोजी सकाळी नालिंबी ते अंबरनाथ रस्त्यालगत असलेल्या निर्जन जंगलात एका अनोळखी पुरुषाचा शीरविरहित मृतदेह आढळला होता. या प्रकरणाने पोलिसांच्या माथ्यावर चिंतेची रेषा उमटली होती. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस पाटील संगीता शिंदे यांच्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
या अमानुष खुनाच्या तपासासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली.
घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचे तांत्रिक प्रयत्न, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा शोध घेण्यात आला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटनास्थळाजवळ संशयास्पदरीत्या आढळलेली कार.
तपासणीअंती ही कार सलमान महंमद गौरी अन्सारी (वय २५, रा. मांडा, टिटवाळा) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सलमानला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने थरकाप उडवणारी कबुली दिली. मृत इसम त्याचाच सावत्र भाऊ फैसल अन्सारी (वय २९) असून, संपत्तीच्या वादातूनच त्याचा खून केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केले.
ही केस केवळ गुन्हे शाखेपुरती मर्यादित राहिली नाही, तर सायबर पथकाच्या सहाय्याने ही गुंतागुंतीची गुन्हेगारी कोडी सुटली. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत शिंदे, फौजदार धनाजी कडव, प्रकाश साईल, संतोष सुर्वे, सतीष कोळी, गोविंद कोळी, हेमंत विभुते यांसह सायबर युनिटच्या दीपक गायकवाड, रविंद्र मोरे यांनी दिलेल्या योगदानामुळे ही केस काही दिवसांतच उलगडली. या खुनाच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.