

चंद्रपूर : सिगरेट दिली नाही, म्हणून किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेची त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१५) राजुरा शहरातील रमाबाई वॉर्ड येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी विधीसंघर्ष बालकाला संशयावरून रविवारी (दि.२२) ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच ही हत्या केल्याची कबूली दिली. कविता लक्ष्मण रायपुरे (वय ५३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
कविता रायपुरे या त्यांचा भाऊ सुरेश रायपुरे याच्यासह राजुरा शहरातील रमाबाई वॉर्डात राहत होत्या. त्यांचे घर किराणा दुकानालगत असून त्या स्वतःचे दुकान चालवत होत्या. सुरेश रायपुरे हे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी कवितांची मुलगी ममता ही दुकानातील फ्रीजमधून दूध आणण्यासाठी आली होती. मात्र दुकान बंद असल्याचे आणि कंपाउंड गेटला कुलूप असल्याचे तिला दिसले. त्यानंतर तिने आईला आवाज दिला, प्रतिसाद न मिळाल्याने तिने स्वतःकडे असलेली चावी घेऊन गेट उघडले. घरातून सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता आई बेडवर निपचित पडलेली दिसली. तिने पतीला बोलावले. त्याने आत जाऊन पाहिले असता कविता यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात कपाळावर धारदार हत्याराने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. रक्तबंबाळ अवस्थेत कविता रायपुरे यांचा मृतदेह आढळून आला. घरात घुसून झोपेत असताना हल्लेखोराने तिचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
राजुरा पोलिसांनी या खुनाचा तपास करताना शहरातील पंधरा ते वीस ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तसेच परिसरातील सुमारे चाळीस संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. या तांत्रिक आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी खुनाचा उलगडा केला.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, संबंधित विधी संघर्ष बालकाने कविता यांच्या दुकानात सिगरेट मागितली होती, मात्र त्या महिलेने त्याला सिगरेट देण्यास नकार दिला. त्यामुळे रागातून त्याने रात्री घरात घुसून धारदार शस्त्राने कपाळावर वार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले.
विधीसंघर्ष बालकाने महिलेच्या हत्येची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.