

Farmers Long March in Nagbhid
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांच्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, अवैध सावकारी, किडनी विक्री रॅकेटचा तपास, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला बोनस मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (दि.३) दुपारी १२ वाजता जनाक्रोश लाँग मार्च काढण्यात आला.
शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा नागभीड शहरातील विविध मार्गांनी १० किमी अंतर पार करत राम मंदिर चौकात पोहोचला. येथे १५ मिनिटे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली, तर मोर्चादरम्यान बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
आज दुपारी १२ वाजता नागभीड तालुक्यातील मिंथूर येथून लाँग मार्चची औपचारिक सुरुवात करण्यात आली. रोशन कुळे यांच्या निवासस्थानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. “जनतेने या संघर्षात सहभागी व्हावे,” असे आवाहन बच्चू कडू यांनी मोर्चाच्या सुरुवातीलाच केले.
मिंथूर ते नागभीड असा १० किमी अंतराचा हा जनाक्रोश मार्च दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सुरू होता. आयोजकांच्या माहितीनुसार, प्रत्यक्ष मोर्चा साधारण २ तास चालला. मात्र, नियोजित वेळेप्रमाणे संपूर्ण आंदोलनाचा कालावधी १२ ते ४ असा ४ तासांचा राहिला. हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी झाले होते.
मोर्चा नागभीड शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत राम मंदिर चौकात दाखल झाला. याठिकाणी १५ मिनिटे रस्त्यावर बसून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नागभीड शहरातील वाहतूक व्यवस्था तात्पुरती विस्कळीत झाली. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठ आंदोलकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूर्णतः बंद ठेवण्यात आली.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी “जय जवान, जय किसान”, “रोशन कुळे यांना न्याय द्या”, “शेतकऱ्यांची कर्जमाफी करा”, “शेतमालाला बोनस द्या”, “स्वामिनाथन आयोग लागू करा” अशा जोरदार घोषणा दिल्या. घोषणांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
अवैध सावकारांविरोधात जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल : बच्चू कडू
मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, “रोशन कुळे यांनी धाडस दाखवून अवैध सावकारी आणि किडनी विक्री रॅकेटचे गंभीर वास्तव समोर आणले. पण इतक्या गंभीर संकटातही स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, पालकमंत्री किंवा खासदारांपैकी कुणीही रोशनच्या कुटुंबाला भेट देऊन धीर दिला नाही, ही मोठी शोकांतिका आहे.” अवैध सावकारांवर कारवाईबाबत बोलताना कडू यांनी कठोर भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “रोशनकडून घेतलेली रक्कम वेळेत परत न केल्यास अवैध सावकारांविरोधात जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करत ते म्हणाले,
“सरकारला आम्ही १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत ठोस निर्णय झाला नाही, तर १९ फेब्रुवारीपासून विदर्भातील प्रत्येक तालुक्यात १० दिवसांची पदयात्रा काढली जाईल. ३० जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास शेतकरी अधिक आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील,” असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनाच्या सभामंचावर शेतकरी नेते बच्चू कडू, वामनराव चटप, रोशन कुळे यांची आई, पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते. मोर्चात अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील शेतकरी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
नागभीडमध्ये निघालेला हा १० किमी लाँग मार्च शांततामय असला तरी, शेतकरी प्रश्नांवरील असंतोषाचा तो मोठा संकेत ठरला. “हा मोर्चा फक्त सुरुवात आहे,” असा आंदोलनाचा सूर सभेतून उमटला. प्रशासनाने तपास व जमीन परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असले तरी, कर्जमाफी आणि शेतमाल बोनसवर सरकार काय भूमिका घेते याकडे आता विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अवैध सावकारांची मालमत्ता गोठविण्याची प्रक्रिया सुरू - अप्पर पोलिस अधीक्षक : ईश्वर कातखेडे
सभेत सहाय्यक पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे यांनी तपासाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “माझ्या नेतृत्वात SIT (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले असून, रोशन कुळे यांच्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. अवैध सावकारांची मालमत्ता गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच उर्वरित आरोपींच्या शोधासाठी कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथे आमच्या विशेष पोलीस टीम कार्यरत आहेत.”
रोशन कुळे यांची शेतजमीन आणि इतर मालमत्ता १ महिन्याच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत मिळेल : जिल्हा सहाय्यक निबंधक
यावेळी जिल्हा सहाय्यक निबंधक यांनी, मंचावरून रोशन कुळे यांच्या शेतजमीन व मालमत्तेबाबत महत्त्वाचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “अवैध सावकारांच्या ताब्यात असलेली रोशन कुळे यांची शेतजमीन आणि इतर मालमत्ता १ महिन्याच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत मिळवून देण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत. असा अन्याय इतर शेतकऱ्यांसोबत झाला असल्यास त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.