

चंद्रपूर : सावकारी कर्जाच्या अमानवी छळातून सुटका मिळवण्यासाठी नागभीड तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार आता वैद्यकीय अहवालातूनही सिद्ध झाला आहे. चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये पीडित शेतकऱ्याची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, अवैध सावकारीसोबतच किडनी रॅकेटचा संशय अधिक बळावला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुळे यांनी अवैध सावकारांच्या जाचातून कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा गंभीर दावा केल्यानंतर या प्रकरणाने खळबळ उडाली होती. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये एकूण सहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी किशोर रामभाऊ बावनकुळे (वय ४२) रा. कुर्झा वार्ड, ब्रम्हपुरी, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (वय ४७) रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी, प्रदीप रामभाऊ बावनकुळे (वय ३८) रा. देलनवाडी वार्ड, ब्रम्हपुरी, संजय विठोबा बल्लारपुरे (वय ५०) रा. फवारा चौक, पटेलनगर, ब्रम्हपुरी, सत्यवान रामरतन बोरकर (वय ५०) रा. टेकरी ता. सिंदेवाही, ह.मु. चांदगाव रोड, दोनोडे सरांचे घरी, ब्रम्हपुरी या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (वय ४२) रा. पटेलनगर, ब्रम्हपुरी हा अद्याप पसार आहे.
अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना ब्रम्हपुरी न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीडित शेतकऱ्याने किडनी विकल्याचा दावा केल्यामुळे पोलिसांनी त्यांची चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सखोल वैद्यकीय तपासणी केली. करण्यात आलेल्या सोनोग्राफी अहवालात रोशन कुळे यांची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले आहे.
या वैद्यकीय अहवालामुळे संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, आता पोलीस केवळ अवैध सावकारीपुरताच नव्हे तर संभाव्य किडनी विक्री रॅकेटच्या अनुषंगानेही तपास करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंबोडियामध्ये किडनी काढण्यामागे नेमके कोण होते, ही शस्त्रक्रिया कुठे आणि कोणाच्या माध्यमातून झाली, तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, फरार आरोपीच्या शोधासाठी ब्रम्हपुरी पोलिसांचे पथक रवाना झाले असून, अद्याप ते पोलिसांच्या हाती गवसले नाही. उर्वरित आरोपींकडून चौकशीदरम्यान आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यात अवैध सावकारीच्या दुष्परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.