

५ आरोपी अटकेत, एक पसार, पोलिस मागावर
ऑनलाईन आर्थिक व्यवहार उघड
किडनी विक्री प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर या गावी उघडकीस आलेल्या धक्कादायक अवैध सावकारी प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत आज बुधवारी पाच आरोपींना अटक केली आहे. अमानवी व्याजदर, आर्थिक शोषण आणि गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे गाजत असलेल्या या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येत असून, एक आरोपी अद्याप पसार आहे. त्याच्या मागावर एक पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अवैध सावकारीविरोधात अन्य प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर या गावातील शेतकरी रोशन कुडे यांनी, सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचामुळे कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचा आरोप केला आणि काल 16 डिसेंबर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणात कालच रात्री उशिरापर्यंत पाव भाजीच्या सहाय्य आरोपीवर सावकार विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. तसेच सावकारांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी किडनी विकण्यासाठी बाद्य केल्याने शेतकऱ्याने किडनी विक्रीकेल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाबाबत अद्याप स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आलीनहे. त्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या अवैध सावकारी प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी आज बुधवारी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किशोर रामभाऊ बावनकुळे (वय ४२, रा. कुर्झा वार्ड, ब्रम्हपुरी), लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (वय ४७, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी), प्रदीप रामभाऊ बावनकुळे (वय ३८, रा. देलनवाडी वार्ड, ब्रम्हपुरी), संजय विठोबा बल्लारपुरे (वय ५०, रा. फवारा चौक, पटेलनगर, ब्रम्हपुरी), सत्यवान रामरतन बोरकर (वय ५०, रा. टेकरी ता. सिंदेवाही, ह.मु. चांदगाव रोड, दोनोडे सरांचे घरी, ब्रम्हपुरी) यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील एक आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (वय ४२) रा. पटेलनगर, ब्रम्हपुरी हा अद्याप पसार असून, त्याच्या शोधासाठी ब्रम्हपुरी पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना आज ब्रम्हपुरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान शेतकरी फिर्यादी आणि अटक करण्यात आलेल्या सावकार आरोपी यांच्यात ऑनलाईन आर्थिक व्यवहार झाल्याची महत्त्वाची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, फिर्यादी शेतकऱ्याने सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा केलेला गंभीर दावा लक्षात घेता, पोलिसांनी या संदर्भात स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. आज बुधवारी फिर्यादी शेतकऱ्याला पोलिसांनी चंद्रपूर येथे नेऊन शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी व सोनोग्राफी करण्यात आली. मात्र या तपासणीत नेमके काय निष्पन्न झाले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना, आवाहन केले आहे की जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारीमुळे आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक छळ होत असल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.