

चंद्रपूर: कर्जफेडीसाठी किडनी विकावी लागल्याचा गंभीर आरोप नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांनी केला. यानंतर चंद्रपूर पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सहा आरोपी सावकारांवर सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी सुमारे सात वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादीच्या रिपोर्टवरून ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 654/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 120 (ब), 326, 342, 294, 387, 506, 34 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत कलम 39 व 44 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे, किशोर रामभाऊ बावणकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे ( वरील सर्व राहणार ब्रम्हपुरी) प्रदीप रामभाऊ बावणकुळे (रा. देलनवाडी, ब्रम्हपुरी, संजय विठोबा बल्लारपूरे, रा. ब्रम्हपुरी, सत्यवान रामरतन बोरकर, रा. ब्रम्हपुरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हे करीत आहेत. ही सर्व कलमे अवैध सावकारी, बेकायदेशीर व्याज आणि आर्थिक शोषणाशी संबंधित आहेत.
नागभीड तालुक्यातील minthur शेतकरी रोशन कुडे यांनी कर्जाच्या जाचामुळे कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. मात्र सध्या किडनी विक्रीबाबत कोणताही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असून, किडनी खरंच कर्जफेडीसाठीच विकली का, कंबोडिया देशात जाण्याची माहिती कुडे यांना कोणी दिली, प्रवास व वैद्यकीय प्रक्रियेची व्यवस्था कोणी केली, तसेच या संपूर्ण व्यवहारामागे कोण सक्रिय होते, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी, जबाब नोंदवणे आणि पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू ठेवली होती. सावकारी जाचामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून किडनी विक्रीसारख्या गंभीर आरोपांमागील सत्य समोर येणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“सावकारी प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी संदर्भातील आरोप अतिशय गंभीर असून त्याची स्वतंत्र व सखोल चौकशी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली आहे.