

Congress Leader Wadettiwar Speech Vidhan Sabha
चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड सोनापूर मार्गावर काल २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने पाठलाग करून त्यांना चिरडले. ही अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक घटना आहे.
ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ही घटना घडली.पण आतापर्यंत रानटी हत्तींच्या हल्ल्यात 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३० ते ३२ हत्तींचा कळप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेकडो झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र वन विभागाकडून केवळ हत्ती हाकलण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून हाकलले की चंद्रपूर जिल्ह्यात येतात, तिथून हाकलले की गडचिरोली मध्ये जातात यावर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना दिसून येत नाहीत.
वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हत्ती आणि मानव संघर्ष हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची मागणी केली. तसेच हत्तींच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सातत्याने लक्ष ठेवावे, नागरिकांना वेळेवर इशारे देण्याची प्रभावी यंत्रणा उभी करावी आणि या प्रश्नासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, खाणकाम आणि जंगलातील अधिवासावर झालेल्या परिणामांमुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग बाधित झाले असून त्यातूनच हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर विधानसभा अध्यक्षांनीही हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जीव जात असतील तर शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. आज अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना हत्तींच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवता येत नसेल, ही गंभीर बाब आहे. शासनाने या प्रकरणाची नोंद घेऊन कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबाबत सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले