

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात कुख्यात गुन्हेगार मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख याच्याकडून ५७.२६० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्स पावडर जप्त करण्यात आली. या कारवाईतून एकूण ४,९१,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट-१९८५ कलम-८ (क), २१ (क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व रामनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. २२ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, रहमतनगर येथील आरोपी शादाब शेख आपल्या घरी एम.डी. पावडर विक्रीसाठी ठेवून आहे. त्यानंतर पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, त्याच्या ताब्यातून एम.डी. पावडर तसेच अन्य मुद्देमाल असा एकूण ४,९१,१०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आसिफरजा शेख यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी सांगितले की, “अंमली पदार्थांचे सेवन व विक्री ही समाजासाठी घातक बाब असून युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी आहे. अशा साखळीचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालीबाबत नागरिकांनी त्वरित चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.