

चंद्रपूर : घुग्घुस येथील ग्लोबल एनर्जी पॉवर प्लांटबाहेर सुरू असलेले कामगारांचे आंदोलन आज शनिवारी अचानक उग्र झाले. मागील सहा दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या मजुरांपैकी आठ कामगार शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजता प्लांटच्या उंच चिमणीत चढले. वढगावचे नरेंद्र वडसकर, सेंगावचे विजय सोनेकर यांच्यासह एकूण आठ मजुरांनी हे आंदोलन केले ते दहा तासापर्यंत त्याच ठिकाणी बसून होते.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने २००८ मध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी दराने जमीन घेतली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले. २०१२-१३ मध्ये १०५ प्रभावित कुटुंबांना नोकऱ्या मिळाल्या. परंतू २०१६ मध्ये प्लांट बंद झाल्याने रोजगारावर गंडांतर आले. त्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रकल्प विदर्भ मिनरल्स अँड लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आला. २०२२ पासून देखभाल कार्य सुरू झाले असले तरी वारंवार पत्रव्यवहार, निवेदने व आंदोलने करूनही स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. उलट बाहेरच्या लोकांची भरती केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
मागील सहा दिवसापासून आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांनी आज शनिवारी पहाटेच्या सुमारास आठ आंदोलकानी चिमणीवर चढून आंदोलन तीव्र केले. त्यानंतर त्यांनी आंदोलनाचा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला. त्यामध्ये त्यांनी आपली व्यथा मांडत म्हटले की, आमची जमीन गेली आणि नोकरीही मिळाली नाही. कोर्टाचा खर्च आम्हाला झेपणार नाही.
लेबर कमिश्नर आणि जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले, पण दखल घेतली नाही. जर रोजगार आणि थकबाकी वेतन मिळाले नाही, तर आमच्याकडे मृत्यू पत्करण्याशिवाय पर्याय नाही. कामगारांनी स्थानिक नेते आणि राजकीय पक्षांवरही टीका केली. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी आधार मागितला जातो, पण संकटाच्या काळात मदतीला कोणीच धावून येत नाही, असा आरोप त्यांनी केला.
घटनेची माहिती मिळताच विजय क्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे आणि अन्य कामगार मोठ्या संख्येने कंपनीच्या गेटवर जमा झाले. पोलिस स्टेशनचे थानेदार प्रकाश राऊत पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊनत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.तब्बल दहा तासापर्यंत आठ कामगार चिमणीवरच चढून आंदोलन करीत होते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार व थकबाकी वेतन द्या, प्लांटमुळे प्रभावित गावांतील स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, कामगारांच्या म्हणण्यानुसार, मागण्या न मानल्यास आंदोलन आणखी उग्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.