

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज जिल्हाभरात मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण २१ जागांपैकी १३ संचालक आधीच बिनविरोध निवडले गेले असून उर्वरित ८ जागांसाठी आज मतदान झाले. ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज गुरुवारी जिल्हाभरात मतदान पार पडले. बँकेवर एकूण एकूण २१ सदस्यांचे संचालक मंडळ कार्यरत आहेत. त्यापैकी या आधीच १३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ८ जागांसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडले. या निवडणुकीकडे राजकीय व सहकारी क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे, कारण सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे.
अलीकडेच जिल्हा बँकेत झालेल्या मेगा भरती प्रक्रियेमुळे बँकेभोवती आर्थिक उलाढालीचा वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे ही निवडणूक अधिक चर्चेत आली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून दोन प्रमुख नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर एकत्र आले आहेत. वडेट्टीवार यांनी स्वतःच्या ऐवजी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असून, धानोरकर या महिला गटातून बिनविरोध निवडून आल्या आहेत. या दोघांच्या एकत्र येण्याने काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दुसरीकडे, भाजपनेही आपली मोर्चेबांधणी पक्की केली आहे. आमदार कीर्ती भांगडिया आणि आमदार किशोर जोरगेवार हे दोघेही निवडणुकीच्या मैदानात सक्रिय असून त्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारात आघाडी घेतली. आज ब्रम्हपुरीत आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर चंद्रपुरात आमदार जोरगेवार यांनी मतदान केले. दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
या निवडणुकीचा निकाल उद्या, ११ जुलै रोजी घोषित होणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला वर्चस्व मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसमधील दिलजमाई कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरली असली, तरी भाजपही ताकदीनं मैदानात आहे. परिणामी, ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC) संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया १० जुलै २०२५ रोजी पार पडली. दरम्यान एक मतदान केंद्रावर वादंगही पाहायला मिळाला. “अ” गटाच्या मतदान केंद्रावर दोन उमेदवारांचे समर्थक आमने सामने आले. धक्का बुक्की वादावादी झाली. यावेळी दोन्ही समर्थांनी आरोप प्रत्यारोप केले. उद्या शुक्रवारी ११ जुलै रोजी चांदा इंडस्ट्रियल इस्टेट, चंद्रपूर येथे मतमोजणी होणार प्रशासनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालाकडे सहकार क्षेत्र आणि स्थानिक राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे