

Palasgaon Forest Range
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि एका महिलेचा बळी घेणाऱ्या टी-१७९ (एसएम-१) वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. शुक्रवारी (दि. ३० ) पळसगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५८ मध्ये विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
काही दिवसांपूर्वी या वाघाने पळसगाव परिसरातील रहिवासी उषा कुरणूले यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शेतात जाणे, जंगल परिसरातून प्रवास करणे याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संबंधित वाघाला तातडीने पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.
परिस्थितीचे गांभीर्य आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन वनविभागाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानगी मिळविण्यात आली. परवानगी प्राप्त होताच वनविभागाने विशेष मोहीम आखून शुक्रवारी कक्ष क्रमांक ५५८ मध्ये टी-१७९ (एसएम-१) वाघाला सुरक्षितपणे जेरबंद केले.
या मोहिमेत चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे तज्ज्ञ पथक तसेच पळसगाव वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला पुढील वैद्यकीय तपासणी, उपचार आणि आवश्यक निरीक्षणासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.
नागरिकांना मोठा दिलासा
महिलेचा बळी घेतल्यानंतर पळसगाव परिसरात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या वाघाला वनविभागाने अखेर जेरबंद केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने केलेल्या या कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे.