

BJP Mandal President Gajanan Guddhe Surrenders
चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेले भाजपचे चिमूर मंडळ अध्यक्ष तथा माजी सरपंच गजानन गुडधे यांनी अखेर गुरूवारी (दि. १२) सकाळी चिमूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी वरोरा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर हजेरी लावली. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे चिमूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिमूर तालुक्यातील एका आदर्श गावातील अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ४ नोव्हेंबर रोजी गजानन गुडधे यांच्याविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, अटकेपासून बचाव करण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यासाठी वरोरा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने काल बुधवारी अर्ज फेटाळल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या. अखेर आज १२ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
या प्रकरणावरून चिमूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवाणी वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपीला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच आरोपीला अटक व्हावी या करिता विद्यमान आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची भेट घेऊन निवेदन दिले होते तसेच त्यांनी आमदार महोदयांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षही चर्चेत आला होता.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी पीडिता आणि तिच्या पालकांनी पोलिसांसमोर नव्याने बयाण नोंदविल्याची माहिती समोर आली होती. या बयाणात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे आणि मूळ तक्रार राजकीय दबावातून दिल्याचे सांगितल्याची माहिती होती. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. एकीकडे मूळ तक्रारीतील गंभीर आरोप, दुसरीकडे नव्याने नोंदविलेले बयाण आणि आता आरोपीचे आत्मसमर्पण, अशा घडामोडींमुळे या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
गजानन गुडधे यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर आता पोलीस या प्रकरणात कोणत्या दिशेने तपास करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मूळ तक्रार, पीडितेचे दोन्ही बयाण, उपलब्ध पुरावे आणि संबंधितांची चौकशी यातून प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. विशेषतः राजकीय दबावाच्या आरोपांचीही पोलिसांना पडताळणी करावी लागणार आहे.