

POCSO Case Chandrapur
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाने आता अनपेक्षित वळण घेतले आहे. भाजपचे चिमूर मंडळ अध्यक्ष तथा आदर्श गावाचे माजी सरपंच गजानन गुडधे यांच्याविरुद्ध ४ नोव्हेंबर रोजी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आरोपीच्या अटकेसाठी काँग्रेसने आंदोलन करीत आक्रमक भूमिका घेतली होती.
मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी पीडिता आणि तिच्या पालकांनी पोलिसांसमोर नव्याने बयाण नोंदविल्याची माहिती समोर आली आहे. या बयाणात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे तसेच मूळ तक्रार राजकीय दबावातून दिल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली असून, नेमके सत्य काय, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
मूळ तक्रारीत गजानन गुडधे यांनी, ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करीत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवाणी वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या निवासस्थानी जाऊन आरोपीच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले. समाजमाध्यमांवरील चित्रफिती, आंदोलन आणि अटकेच्या मागणीमुळे हे प्रकरण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.
मात्र, पीडिता आणि तिच्या पालकांनी नव्याने दिलेल्या बयाणामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. सुरुवातीला दाखल करण्यात आलेली तक्रार राजकीय दबावातून होती की आता नव्याने बयाण नोंदविताना दबाव आणण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या तक्रारीतील आरोप आणि नव्या बयाणातील कथन यामध्ये नेमकी तफावत का निर्माण झाली, याचाही तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा तपासातून सत्य समोर येणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलिसांच्या तपासाकडे लक्ष
पोक्सोसारख्या संवेदनशील प्रकरणात पोलिसांसमोर आता मोठी कसोटी आहे. मूळ तक्रार, पीडितेचे आधीचे व आताचे बयाण, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी या सर्व बाबींच्या आधारे निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. पीडितेची ओळख गोपनीय ठेवून तिच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणेही आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती समोर आणण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
एकीकडे गंभीर स्वरूपाचे आरोप, दुसरीकडे मूळ तक्रार राजकीय दबावातून दिल्याचे सांगणारे नवे बयाण आणि त्यातच काँग्रेसची आक्रमक भूमिका यामुळे चिमूरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मात्र, या संपूर्ण राजकीय संघर्षात पीडितेच्या हिताला बाधा न पोहोचता प्रकरणातील सत्य निष्पक्ष तपासातून समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.