

Chandrapur Sickle Cell Treatment
चंद्रपूर : सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ICMR, पडोली येथे सिकल सेल डिसीज (SCD) आणि थालेसेमिया रुग्णांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट (CCU) आणि प्रीनेटल डायग्नोसिस (PND) या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवांचा शुभारंभ करण्यात आला.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्यसेवांचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधांमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांना आवश्यक तपासणी, निदान, वैद्यकीय सल्ला, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी अधिक सुलभ आणि समन्वित सेवा उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमुख/प्रशासक डॉ. विंकी रुघवानी, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या माजी अध्यक्ष तथा सिकलसेल निर्मूलन कार्यगटाच्या अध्यक्ष डॉ. दिप्ती जैन, ICMR संचालक डॉ. मनिषा मदकाईकर, ICMR-NIRBID चे सायंटिस्ट प्रभाकर केदर, गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा परिषद चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते आणि जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चत्रेश्वर यांच्यासह संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सिकलसेल व थालेसेमिया या अनुवंशिक रक्तविकारांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नियमित तपासणी, आजाराचे सातत्याने निरीक्षण, तज्ज्ञांचा सल्ला, योग्य उपचार आणि समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. ICMR, पडोली येथे सुरू झालेल्या नव्या सुविधांमुळे या सर्व बाबींसाठी रुग्णांना अधिक सुलभ आणि नियमित आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी या सुविधा दिलासादायक ठरणार आहेत. रुग्णांची वेळेवर तपासणी, आजाराच्या स्थितीचे नियमित निरीक्षण, आवश्यक निदान चाचण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळी उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.
प्रीनेटल डायग्नोसिस (PND) सुविधा सुरू झाल्याने सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांच्या संदर्भात आवश्यक वैद्यकीय निदान आणि तज्ज्ञ समुपदेशनाची सुविधा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि कुटुंबांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल व थालेसेमिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग, ICMR आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या या सुविधा अनुवंशिक रक्तविकारांच्या सर्वसमावेशक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक पाऊल ठरणार आहेत. जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा. तसेच सिकलसेल व थालेसेमियाबाबत नियमित तपासणी करून घ्यावी आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला व समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.