

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आटमुर्डी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली असून, विविध प्रलंबित मागण्या आणि गावातील विकासकामांच्या पारदर्शकतेसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर बसून त्यांनी आंदोलन केले.
गेल्या पाच वर्षांतील ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा तसेच जमा-खर्चाचा सविस्तर हिशोब ग्रामस्थांनी मागितला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्याची मागणी लावून धरली.
गावातील समस्या मार्गी लावणे आणि कारभारात पारदर्शकता आणणे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मागण्या मान्य होईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावरून खाली न उतरण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी आटमुर्डी येथे पोहोचून ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेत सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामपंचायतीच्या विविध कामांच्या अहवालाची त्रिस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात येणार असून, त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल, असे मुंडकर यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून आता कोणती कार्यवाही केली जाते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.