

Bunty Kukde vs Praful Gudadhe
नागपूर : आपल्या पदग्रहण कार्यक्रमात काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी केलेल्या ‘भाजपाचे शटर बंद’या वक्तव्यावरून सुरू झालेली राजकीय आरोप-प्रत्यारोपांची शृंखला अद्याप संपली नाही. यानंतर प्रफुल्ल गुडधे यांनी पत्रपरिषद घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती.
या टीकेला भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक बंटी कुकडे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून उत्तर दिले. गुडधे यांचे वक्तव्य मानसिक असंतुलनाचे लक्षण असून ते अत्यंत विकृत आणि ‘अर्बन नक्षल’ मानसिकतेचे नेते आहेत, असा घणाघाती आरोप कुकडे यांनी केला आहे.
‘काँग्रेसमधील गटबाजीचे प्रफुल्ल गुडधे यांची शटर बंद करणार’, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यानंतर पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रफुल्ल गुडधे यांनी महसूलमंत्र्यांवर निशाणा साधला होता. भाजपात बहुजन नेत्यांची दुकानं कशी बंद झाली, २०१९ मध्ये कशा प्रकारे बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले, महसूल खात्यासंदर्भात कशा प्रकारे त्यांच्या पक्षातील लोक काम करीत आहेत, हे सांगताना गुडधे यांनी बावनकुळेंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.
पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांनी राजकीय आरोप करण्याऐवजी जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात बोलावे, जनतेच्या हिताची काळजी घ्यावी, असा टोमणा प्रफुल्ल गुडधे यांनी लगाविला होता. भाजपाचे माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रपरिषदेतून प्रफुल्ल गुडधे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
कुकडे म्हणाले, बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यात महायुतीला एकतर्फी विजय मिळाला. अनेक जिल्ह्यांत काँग्रेसच्या कार्यालयांना कुलूप लागले. भाजपा हा लाखो कार्यकर्त्यांच्या त्यागावर उभा असलेला जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्याला ‘दुकान’ संबोधणे हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. भाजपा सोडून बाहेर पडल्यानंतर गुडधे यांच्या परिवारातील कोणीही आमदार किंवा मंत्री होऊ शकला नाही, हा इतिहास त्यांनी विसरू नये.
पत्रपरिषदेला किसन गावंडे, किशोर वानखेडे, अॅड़ कांचन करंभे, नरेश बरडे, अनिल मानापुरे, सचिन करारे, सुमीत पडोळे, नीलेश टेकाडे, हर्षल तिजारे, पवन तिवारी व वैभव बावनकर उपस्थित होते.
माझ्यावर ‘अर्बन नक्षल मानसिकतेचे नेते’ असे जे आरोप केले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी त्यांच्याच पक्षाचे गृहखात्याचे मंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मी जर अर्बन नक्षल आहे, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी तशी तक्रार करावी. कायदेशीर कारवाईसाठी मी तयार आहे.
- प्रफुल्ल गुडधे, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष